हत्तुर, कासेगाव येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी  


सोलापूर, (जिमाका) दि. 04 – सोलापूर जिल्ह्यात 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर  2023 या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, पपई, डाळिंब, कांदा, टोमॅटो, ज्वारी, हरभरा, तूर, गहू,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तुर येथील शेतकरी नागनाथ भोपळे व कासेगाव येथील विक्रम मेटकरी, अजित मेटकरी  यांच्या शेत पिकांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली.  यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  उपसंचालक कृषी राजकुमार मोरे, तहसिलदार  राजशेखर लिंबारे उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती त्यांनी घेऊन एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.Source link

Leave a Comment