सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक – कृषिमंत्री धनंजय मुंडे


मुंबई दि. १० :- ‘प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजने’तील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’अर्थात प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणींबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्री श्री. मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष के एम महामूलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास, ‘पोकरा’चे व्यवस्थापकीय संचालक परिमल सिंह आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनांतील नियमावलीत बदल करून उत्पन्नाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. महाडीबीटी पोर्टल वरील अडचणींची सोडवणूक करण्यात येईल.

तसेच इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करावा, असेही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/



Source link

Leave a Comment