संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी


मुंबई दि.3- मुंबई स्वच्छ, सुंदर प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यात मुंबईकरांनी सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबई महापालिकेतर्फे आयोजित संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी डी वॉर्डातील कमला नेहरू उद्यान, बाणगंगा तलाव, गिरगांव चौपाटी, बी.आय.टी. चाळ परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी बी.आय.टी. चाळ परिसरात नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

kamla nehru1.jpg.pagespeed.ce.k5DSqu0CLc

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला, त्यांनी हातात झाडू घेत सर्व देशवासियांना अभियानात सहभागासाठी प्रेरित केले. त्यानंतर बघता – बघता ही लोकचळवळ बनली. त्याच धर्तीवर मुंबईचा कायापालट करण्यासाठी ही मोहिम महत्वाची आहे. मुंबईतील रस्ते स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण अशा विविध पातळीवर या मोहिमेत काम करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट दिली. या वसाहतीत असणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम सुरू झाले आहे. जे सफाई कर्मचारी बांधव मुंबई स्वच्छ ठेवतात त्यांच्या वसाहती देखील स्वच्छ सुंदर असायला हव्यात, असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिसरातील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिलावर्गाने औक्षण करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

कमला नेहरू उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ कमला नेहरू उद्यानातून मुख्यमंत्र्यांचे हस्ते वृक्षारोपनाने करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्यानाची पाहणी केली. तसेच या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट विद्यार्थ्यांनी धरला असता मुख्यमंत्र्यांनी आवर्जून फोटो काढून घेतले.

बाणगंगा तलाव परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी         

मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा तलाव परिसरातील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तलाव परिसरात सुशोभिकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासोबत फोटो देखील काढून घेतले.

000



Source link

Leave a Comment