श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप


मुंबई. दि. १२ : अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा राज्यातील एकूण 1,कोटी 68 लाख 50 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना दि. 22 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदाचा शिधा वाटप सवलतीच्या 100 रुपये दरात करण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा संचामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा असे सहा शिधाजिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता एकूण 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सन 2022 च्या दिवाळी सणानिमित्त, सन 2023 च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त तसेच सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर  सन 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात आला आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/



Source link

Leave a Comment