शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- डॉ.ओमप्रकाश शेट्ये


छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवेतील तसेच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सर्वोत्तम आरोग्य योजनेचा लौकिक कायम राखावा, असे आवाहन आयुष्मान भारत मिशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना या योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, डॉ. रवी भोपळे, डॉ. मिलिंद जोशी तसेच योजनांशी संलग्नित हॉस्पिटल्सचे संचालक, डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

बैठकीत १ एप्रिल ते ५ डिसेंबरअखेर जनआरोग्य योजनांशी जिल्ह्यात ३८ हॉस्पिटल्स संलग्नित आहेत. त्यात आतापर्यंत २२ हजार ७३४ रुग्णांवर ४६ हजार २८ उपचार/ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून १२५ कोटी २१ लक्ष ४ हजार २६ रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती देण्यात आली.

डॉ. शेट्ये यांनी सांगितले की, या योजनांद्वारे गोरगरिबांना आरोग्य उपचाराच्या सुविधा मिळाव्या हा उद्देश असून त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या योजना राबविताना संलग्नित हॉस्पिटल्सना येणाऱ्या अडचणी दूर करुन अधिकाधिक लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

जन आरोग्य योजनांचा लाभ देता यावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी, ई केवायसीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे डॉ. भोपळे यांनी सांगितले.

डॉ. शेट्ये यांनी संलग्नित रुग्णालय संचालकांच्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. भोपळे यांनी आभार मानले.

०००००

 Source link

Leave a Comment