शेती, दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्या- राज्यपाल रमेश बैस


नागपूर, दि. १3 : भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हा आहे. आज लोकसंख्या वाढत आहे, मात्र शेतीपयोगी जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. आगामी काळात ज्याच्याजवळ जमीन तोच खरा धनवान राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यपाल कार्यालयाच्या प्रधान सचिव श्वेता सिंघल, सचिव राजेंद्र अरजड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ शिरीष उपाध्याय, दुग्धव्यवसाय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक, विस्तार व शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आरजू सोमकुंवर, पशु, प्रजनन शास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीप रघुवंशी आदी यावेळी उपस्थित होते.governer bais1 1

आजच्या काळात शेतजमीन वाचविणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, अन्नधान्याच्या बाबतीत देश आत्मनिर्भर झाला असून श्वेतक्रांतीतून दुधाचे उत्पादन वाढले आहे. मात्र असे असले तरी आज जास्तीत जास्त शेतजमिनीचा उपयोग करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढविता याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतर अधिष्ठाता व प्राध्यापकांनी गावागावात पोहचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. केवळ विद्यापीठाच्या दैनंदिन कामापुरते मर्यादीत राहू नये. फिल्डमध्ये जावून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकाव्यात व त्याचे निराकरण करावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष योजना आणणे गरजेचे आहे, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ झाला तरच देशाची प्रगती होईल.

आज गोड्या पाण्यातील माशांची मोठी मागणी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी आजची परिस्थती आहे. विदर्भातील जमीन ही उंच-सखल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी अडवून त्यात मत्स्य उत्पादन करणे शक्य आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज, बोटूकली आदी उपलब्ध करून द्यावे, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. म्हणाले, पशु व मत्स्यविज्ञान क्षेत्रासाठी हे एकमेव विद्यापीठ आहे. पशुवैद्यकीय, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य उत्पादनाबाबत या विद्यापीठात शिक्षण व संशोधन केले जाते. विद्यापीठातील तंत्रज्ञान जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यासाठी इतर संलग्न महाविद्यालयात पोहचविले जाते. भविष्यातही प्रादेशिक विभागाच्या गरजेनुसार विद्यापीठाचे संशोधन नियमितपणे सुरू राहील. लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विद्यापीठाचे योगदान मोठे आहे, असेही त्यांनी नमुद केले.

यावेळी डॉ. शिरीष उपाध्याय यांनी विद्यापीठाच्या कामाकाजाबाबत सादरीकरण केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचे नवीन वर्षाचे कॅलेंडर व पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महेश जावळे यांनी केले तर आभार डॉ. नितीन कुरकुरे यांनी मानले.

भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान आणि कृत्रीम परिवेक्षीय निषेचन प्रयोगशाळेला भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान  आणि कृत्रीम परिवेक्षीय निषेचन प्रयोगशाळेला भेट दिली.  या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च अनुवांशिकता असलेल्या साहिवाल, गीर, गवळाऊ, डांगी आणि देवणी या देशी गोवंशाच्या गायीचे पुनरुत्पादन केले जात आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरअंतर्गत कार्यरत भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत भ्रुण प्रत्यारोपणाचे यशस्वी प्रयोग करण्यात येऊन एकूण 31 गायींमध्ये आयव्हीएफ म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे गर्भधारणा झाली असून एकूण 23 निरोगी सुदृढ वासरे जन्माला आली आहे.

 



Source link

Leave a Comment