शिवछत्रपतींचा जीवनपट चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


‘जाणता राजा’चा प्रयोग उद्यापासून सर्वांसाठी खुला

प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

नागपूर दि. १३ : जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आमच्या मनात जोश, वर्तनात आदर्श आणि मनामनात ऊर्जा निर्माण करत राहणार आहे. शिवचरित्र युगानुयुगे आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत्र राहणार आहे, असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

6 1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून आज शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हा शुभारंभ झाला.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जायस्वाल, माजी खासदार विकास महात्मे,  महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

8

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350  वर्ष पूर्ण झाल्यानिमित्याने अतिशय समर्पक भूमिका घेत राज्यभर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणता राजाचा राज्यस्तरीय पहिला प्रयोग नागपूर येथे होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाची सुरुवात केली होती, याचे देशभर शेकडो प्रयोग झाले, नागपुरातही अनेक प्रयोग झाले, मात्र दरवर्षी हे नाटक आपल्याला बघावसे वाटते इतके प्रेरणादायी आहे.

जेव्हा आमचे अस्तित्वच नाकारले गेले होते त्यावेळेस शिवरायांनी अतुलनीय पराक्रम गाजवत दडपशाहीला मिटवून टाकले. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत शिवरायांचे चरित्र आम्हाला प्रेरणादायी असेल. ते कायम आम्हाला ऊर्जास्त्रोत असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

4

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. त्यांचे नुसते नाव विचारले तरी स्फुल्लिंग जागृत होते. यावेळी त्यांनी लंडनवरून शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा करार करण्यात आल्याचे सांगितले. लवकरच ही वाघ नखे महाराष्ट्रात येणार असून लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सीएसआर निधीमधून हे काम हाती घेण्यात येणार आहे. जनसामान्यापर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

रविवार, सोमवारचा प्रयोग सर्वांसाठी खुला

जाणता राजा या प्रयोगाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्यापासून हा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे उद्या रविवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवचरित्रावरील आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

०००



Source link

Leave a Comment