शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून राहावी


अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून राहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमूर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फोटो 9

कन्व्हर्जन्स ऑफ नॉलेजबाबत मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले, माणूस त्याच्या गुणवत्तेतून मोठा होत असतो. वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व हे केवळ शिक्षणाने तयार होत नाही तर त्यासाठी संस्काराचे कोंदण आवश्यक आहे. संताचे चांगले विचार आणि मार्गदर्शनामुळे समाज प्रगल्भ होतो. डोळे दान करता येतात, परंतु दृष्टी दान करता येत नाही. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्व-विकासासोबतच समाजाचाही विकास व्हावा, यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहावे. आपला देश खेड्यात वसतो. येथील कृषिबांधव केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. भाऊसाहेबांचे हेच स्वप्न होते. शेतकरी, गोरगरीब या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणगंगा घरोघरी पोहचविली. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांच्यासारख्या अभ्यासू आणि सम्यक व्यक्तीला पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येत आहे, हा खऱ्या अर्थाने या पुरस्काराचा सन्मान आहे. श्री. पवार यांनी देशातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न केला. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बी-बियाणे, जैव तंत्रज्ञान, खते व्यवस्थापन यांना प्रोत्साहन दिले. कृषी संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीपूरक व्यवसायाला मार्गदर्शन केले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती उत्पादन वाढीसाठी उपयोग झाला, असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

फोटो 20

पुरस्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराचा प्रथम मान मला देण्यात आला, यासाठी मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आभारी आहे. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. माझी आई हीदेखील महिला शेतकरी होती. तिने शेतात कष्ट करुन आम्हा भावडांना मोठे करुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्य शेतकरी महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान होणे गरजेचे आहे. यातून अन्य शेतकरी महिलांचा आत्मविश्वास दुणावेल, असेही ते यावेळी म्हणाले.

कृषिरत्न तसेच शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती उत्सवानिमित्त भारत सरकारने निर्माण केलेल्या 125 रुपयाच्या नाण्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिवसंस्था’ मासिक, दैनंदिनी, दिनदर्शिका-2024, भाऊसाहेबांच्या जीवनावरील छायाचित्रांचे पुस्तक व चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचे व डॉ. पंजाबराव देशमुख अध्यासन केंद्राचे उद्घाटन रिमोटची कळ दाबून ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नूतनीकृत स्मृतीभवन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन ग्रंथालयाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 5 लक्ष रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी संस्थेच्या विविध विद्याशाखेत गुणवंत ठरलेल्या मुलींना श्रीमती विमलाबाई देशमुख, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर फुले तर आभार दिलीप इंगोले यांनी मानले.

 Source link

Leave a Comment