शासनाचे जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अमरावती, दि. १६ : राज्य शासन ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे. शासन जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

WhatsApp Image 2023 12 16 at 8.03.36 PM

हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या ‘शिवमहापुराण कथे’चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, चंद्रकुमार जाजोदीया, सुनील राणा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्नरत आहे. या राज्याची वाटचाल प्रभू श्रीराम व शिवाजी महाराजांच्या विचारांवर सुरु आहे. अयोध्याच्या धर्तीवर येथील हनुमान गढी येथे १११ फुटी भव्य रामभक्त हनुमानाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ही अभिनंदनीय बाब असून हनुमानाच्या नावारुपाला शोभेल असे हे ठिकाण भविष्यात जनसामान्यांचे आध्यात्मिक तीर्थस्थळ बनेल. शिवमहापुराणातील शिकवणची समाजाला आवश्यकता आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन रामराज्य निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान हनुमान मुर्तीचे चरण पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रारंभी शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

तत्पूर्वी दुपारी मुख्यमंत्र्यांचे बेलोरा विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार आदींनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

०००



Source link

Leave a Comment