विधानपरिषद लक्षवेधी


एमआयडीसीतील इंडिया बुल्सला दिलेली जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू- उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 8 : नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडियाबुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या प्रकल्पास दिलेली सर्व जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील विकसित न केलेल्या जमिनी परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सचिन अहिर, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, अतिरिक्त सिन्नर औद्योगिक वसाहतींमध्ये इंडिया बुल्स कंपनीला जमीन वाटप करण्यात आली होती. मात्र, कंपनीने वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये विकास करण्याची कार्यवाही केली नसल्याने जमीन परत देण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एमआयडीसी कायदे व न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रकल्पबाधित झालेल्यांना वाटप करण्यात येणाऱ्या एकूण ४८२ भूखंडापैकी आतापर्यंत २८२ भूखंडाचे वाटप करण्यात आले असून २०० भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण करण्यास बहुसंख्यांचा विरोध असल्यास ही एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचा विचारही करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००००

समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांचेप्रभावी अंमलबजावणी करणार- मंत्री दादाजी भुसे 

नागपूर, दि ८: समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व सोयीसुविधांसह रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देतांना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील १६ ठिकाणांवर सर्व सोयीसुविधांसह पेट्रोल, डिझेल पंप, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, चहा- नाश्ता अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करणे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. वेग मर्यादा फलक, चिन्ह फलक, सूचना फलक अशा उपाययोजना फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरियर्स बसविण्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने माहितीपत्रके, फलक लावण्यात आलेले आहेत.

हा महामार्ग ज्या ८ जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागाचे प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध देण्यात आली आहेत. या पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकाचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्य करण्यात येतात. या उपाययोजना महामार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

वन्य प्राण्यांसाठी ज्या भागात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्या-त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरिकेट लावण्यात आले आहे.

मंत्री श्री भुसे म्हणाले, संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असतांना झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे १३ प्रवासी मृत्यूमुखी पडले व २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली असून या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ०२ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

अपघातग्रस्त वाहनाची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने केली आहे. वाहनाची नोंदणीकृत आसन क्षमता 17+1 अशी असताना या वाहनांमधून बेकायदेशीर रित्या 34प्रवासी प्रवास करत होते. या वाहनास वेग नियंत्रक बसविलेले नव्हते. तसेच वाहनाच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, वाहन चालकास प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालवण्यात येत होते.वाहनाचा कर वैध नसताना वाहन रस्त्यावर आणले इत्यादी त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.या महामार्गामुळे 900 किमी अंतर वरून 700 किमी अंतर झाले आहे.वेळ,आणि डिझेल, पेट्रोलची बचत देखील होत आहे.१५ जिल्ह्याचा विकास होत आहे.तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.या महामार्गामुळे मुंबई-नागपूर ही शहरे जवळ आली आहेत. हा एक सकारात्मक प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अपघातातील १३ मृत प्रवासीयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये पाच लाख याप्रमाणे एकूण रुपये ६५,००,०००/-(रुपये 65 लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी: ६६८२२ टायर तपासणी, रिफ्लेक्ट नसलेली ९४८ वाहन, ब्रेथ ॲनालाइजर 21265, लेन कटिंग 4931, ओव्हर स्पीड 612, नो पार्किंग 5898, दोषी वाहने, 10581, एकूण दंड वसूल 27लाख 25 हजार 455 करण्यात आला आहे. तसेच समृद्धी महामार्ग 1 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 4 हजार 500 वाहनचालकाचे समुपदेशन करण्यात आले आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रस्त्यावरील व महामार्गावरील अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तसेच विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,सदस्य अनिल परब,अनिकेत तटकरे,राजेश राठोडयांनी सहभाग घेतला होता.

०००००



Source link

Leave a Comment