विधानपरिषद प्रश्नोत्तरे


कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई – मंत्री उदय सामंत

नागपूर दि. 13 : कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू न करणारे मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. कंत्राटदाराची सुरक्षा रक्कम व अनामत रक्कम जप्त करणेबाबत व दंड वसूल करण्याबाबतची कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबईतील रस्त्याची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता.

बृहन्मुंबई  महानगरपालिका अखत्यारीतील सुमारे 397 कि.मी.लांबीच्या 910 रस्त्यांची सिमेंट काँक्रीटद्वारे सुधारणा करण्यासाठी एकूण पाच कंत्राटदारांना  जानेवारी, 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. त्यामध्ये शहर विभागातील एका कंत्राटदारास 72 कि.मी.लांबीचे 212 रस्ते, पूर्व उपनगरातील एका कंत्राटदारास 71 कि.मी.लांबीचे 188 रस्ते व पश्चिम उपनगरातील तीन कंत्राटदारांना  २५४ किमी लांबीचे 510 रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. त्यापैकी शहर विभागातील  कंत्राटदार मे. रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा. लि. यांनी मे 2023 अखेर पर्यंत (पावसाळ्यापूर्वी ) केवळ सात रस्त्याची कामे नाममात्र सुरू करून कोणतेही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदारास देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली. याचर्चेत सदस्य सर्वश्री अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

———-0—————

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील १९६ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. 13 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 21 उमेदवार वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती  मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी एक, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन या पदावर शिफारस केलेल्या ईडब्लूएस प्रवर्गातील 21 उमेदवारांना वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत जलसंपदा विभागाने 17 नोव्हेंबर 2023 व सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी आदेश निर्गमित केले आहे. याप्रकरणी याचिका न्यायप्रविष्ठ असल्याने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्तीबाबत प्रतीक्षा करणे उचित होईल असे विधी व न्याय विभागाने अभिप्राय दिले आहेत. 21 ईडब्ल्यूएस  उमेदवारांच्या नोकरीला बाधा येणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 ————–0——————-

नागपुरातील ऐतिहासिक लेंडी तलावाच्या पुनर्जीविताचे काम सुरू – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 13 – केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या लेंडी सरोवर/तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास नोव्हेंबर 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असून 14.13 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पाचे सध्या पुनरुज्जीविताचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली

नागपूर शहरातील ऐतिहासिक लेंडी तलाव पुनर्जीवित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रविण दटके यांनी सहभाग घेतला होता.

नागपूर महानगरपालिकेमार्फत या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून मे. आदित्य कन्सट्रक्शन कंपनी यांना दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी कार्यादेश देण्यात आलेले असून प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तलावातील गाळ काढण्याचे उद्देशाने उन्हाळ्यात तलाव रिक्त करण्याच्या कामास  सुरुवात करण्यात आली होती. परंतु पावसाळ्यात तलाव रिक्त करण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले. सद्यःस्थितीत तलाव रिक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे आजमितीस कोणतेही देयक कंत्राटदारास देण्यात आलेले नसल्याने प्रकल्पावर खर्च निरंक असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या लेंडी सरोवर पुनर्जीवन प्रकल्पाच्या केंद्र व राज्य हिश्यापोटीच्या प्रथम हप्त्याच्या रुपये 1.412 कोटी किमतीची पतमर्यादा देण्यात आलेली असून सदर निधी खर्च झाल्यानंतर पुढील हप्त्याच्या निधीची  पतमर्यादा नागपूर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 ————–0——————-

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन – मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि. 13  : राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या-त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला होता.

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा एक हजार रुपयावरुन पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे. सध्या 1500 रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. आर्थिक निकषांची मर्यादा वाढविण्यात येईल. दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

000000

श्री. दत्तात्रय कोकरे/विसंअ

 ————–0——————-

 Source link

Leave a Comment