वाद व संबोधन कार्यक्रम आनंद सोहळा होतो तेंव्हा …


उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, रांगोळी आणि नवी उमेद

उदगीर, (लातूर)दि. ४ :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनात काय ऐकायला मिळणार ! मुख्यमंत्री अर्थात लाडक्या बहिणींचा भाऊ नवीन काय संदेश देणार… तर देवेंद्र फडणवीस नवीन काय बोलणार अशा सर्व उत्सुकतांना घेऊन जिल्हाभरातील महिलांच्या उदगीर येथील हजारोंचा समुदाय आज सेलीब्रेशन मूडमध्ये होता. त्यामुळे पोस्टर, बॅनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी हस्तांदोलन तर कुठे रक्षा बंधन असा एकूणच आनंददायी माहौल उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर होता. त्यामुळे संवाद संबोधनाचा कार्यक्रम आनंद सोहळा झाला होता.

या आजच्या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे स्पर्धा, पैठणी वाटप, विविधांगी घोषवाक्य प्रत्येकाचा वेगळा ड्रेसकोड आणि महाराष्ट्राच्या वैभवाची सुरेल संगीत मैफील यामुळे आनंद मेळावा आणखी मजेदार झाला.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला सरपंच पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून आल्या होत्या. त्यांच्या हाती राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री महोदयांचे छायाचित्र असलेले फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या फलकांवर विशेषत्वाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांच्या फलकांचा समावेश होता.

आकर्षक व्यासपीठ

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावर आकर्षक कमानी उभारण्यात आल्या होत्या. सोबतच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी मुख्य व्यासपीठ विविध रंगीबेरंगी पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, भारतरत्न                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि विशेषत्वाने देशाला महाराष्ट्राची महिला सशक्तीकरणाच्या योगदानातून नवी ओळख देणाऱ्या रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. तसेच व्यासपीठासमोरील जागेत कृषि विभागाच्यावतीने काढण्यात आलेली बाजरा, भगर आदी विविध धान्यापासून रांगोळी काढून मिलेट वर्ष साजरे करताना नागरिकांनी आपल्या आहारात कडधान्याचा वापर करण्याचा ‘मिलेट हट’च्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता.

आशयपूर्ण रांगोळ्या

साधारणत: रांगोळी हा कलात्मक प्रकार त्यातील रंग छटा आणि रेखाचित्रांवर असते. मात्र, आज आनंद मेळाव्यात काढण्यात आलेली रांगोळी आशयघन होती. रांगोळीला काही बोलायचे होते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व तृणधान्यांचा वापर याचा संदेश या रांगोळीतून दिला जात होता.

शहरात मान्यवरांचे आकर्षक कटआऊट्स

आजच्या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक नगरी उदगीर शहरात येणाऱ्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचे लक्षवेधक कटआऊट्स शहरात तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. संदीपान जगदाळे व सहकारी लातूर, जल्लोष ग्रूप नागपूर आणि येडवे व बिदरकर गुरुजी, सोलापूर यांच्या चमूने उपस्थितांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

लातूरच्या आगळ्यावेगळ्या येळवसचे आकर्षक दालन

लातूर-धाराशिव जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘येळवस’अर्थात वेळ अमावस्याचे स्वतंत्र दालन स्टेजसमोर  तयार करण्यात आले होते. या दालनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाच्या स्थळी राज्य शासनाच्या कृषी विभाग, रोजगार उद्योजकता व कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण, सामाजिक न्याय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, जिल्हा आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली होती.

००००

 



Source link

Leave a Comment