लातूरला प्रस्तावित नियतव्ययापेक्षा अधिक निधी देणार


जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक स्थान लक्षात घेऊन होणार निधी वितरण

लातूर, दि. १० (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेचा 2024- 25 अंतर्गत लातूर जिल्ह्याला 323 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार यांची मागणी लक्षात घेऊन यापेक्षा अधिकचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिली. सन 2024-25 करिता दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

LATUR 3

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नमन गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने नियतव्ययपेक्षा अधिकच्या निधीची मागणी केली आहे. त्याचा विचार करून 323 कोटीपेक्षा अधिकचा निधी दिला जाईल. वाढ करताना त्या जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक स्थान याचा विचार केला जाईल. त्या-त्या विभागाच्या यंत्रणांनी दिलेल्या निधीचा योग्य आणि न्याय कामासाठी वापर होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

LATUR 1

पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्ह्याला निधी वाढवून देण्याची मागणी केली. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी उदगीर येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहाला तसेच उदगीर येथील शासकीय रुग्णालयासाठी निधी वाढवून मिळावा, अशी मागणी केली.

औसा येथील तालुका क्रीडा संकुलासाठी, कोयना भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जसा निधी मिळतो तसाच निधी किल्लारी भागाला मिळावा तसेच हसूरी आणि परिसरात नेहमीच भूकंपाचे हादरे बसत आहेत. त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी 15 कोटीचा निधी मिळावा, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यासाठी भरीव निधीची गरज असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी, यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी मागणी केली.

जिल्ह्याचा 2024-2025 चा वार्षिक नियतव्यय, जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजना त्याला लागणारा वाढीव निधी याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी केले.

०००



Source link

Leave a Comment