लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह


मुंबई दि.3- मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली. दुसऱ्या बाजूला या मोहिमेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, त्यांच्यांशी बोलण्याची उत्सुकता दिसली.

सुरुवातीला कमला नेहरू उद्यान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले असता त्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मग मुख्यमंत्र्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करत फोटो काढले. नंतर कमला नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या विविध विद्यालयाच्या आणि स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हाक मारली. त्यांनीही मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत मुलांच्या आग्रहास्तव फोटो पण काढले. हाच प्रकार गिरगांव चौपाटी आणि बी.आय.टी. चाळ येथे ही घडला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचा हट्ट पुरवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

गिरगांव चौपाटीवर लुटला क्रिकेटचा आनंद

गिरगाव चौपाटी येथे पाहणीसाठी गेले असता तेथे क्रिकेट खेळणारी मुले मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून पुढे आली. तेव्हा वाहनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरलेले पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांना जवळ बोलवून त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढलेच. याचवेळी या मुलांनी मुख्यमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह ही केला. मग मुख्यमंत्र्यांनी देखील या मुलांचे मन राखून हाती बॅट घेत फटकेबाजी केली. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत क्रिकेट खेळतांना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आपल्या विकासाभिमुख कामांमुळे जनतेत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लहान मुलांचेही तितकेच लाडके असल्याचे आजच्या मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या दौर्‍यात दिसून आले.

००००



Source link

Leave a Comment