मुंबई, दि. 18 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकमान्य टिळक उद्यानात सुरू केलेला लाइट ॲण्ड साऊंड शो उपक्रम कौतुकास्पद आहे. आगामी काळात राष्ट्र पुरुषांच्या जीवनावरील लाइट ॲण्ड साऊंड शो पहावयास मिळतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक उद्यानाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण, स्वराज्यभूमी फलकाचा अनावरण सोहळा व लाइट ॲण्ड साऊंड शोचे उदघाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य उज्ज्वला मेहेंदळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांना प्रेरित केले. त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे‘, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेल्या या उद्यानात अर्थात स्वराज्य भूमीत महानगरपालिकेने केलेले नूतनीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी मंत्री श्री. लोढा, मंत्री श्री. केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती जोशी म्हणाल्या की, लोकमान्य टिळक उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून लेझर शो, मुलांसाठी ग्लो गार्डन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
000
गोपाळ साळुंखे/ससं/