राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा, युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करा


मुंबई, दि. १२ : १९ वर्षाखालील मुलींकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी मैदानांची उपलब्धता तसेच सुरक्षित निवासव्यवस्था करण्यात यावी. क्रीडा स्पर्धांबरोबरच जिल्हा आणि विभागस्तर युवामहोत्सव २०२३-२४ चे देखील सर्वोत्कृष्ट आयोजन प्रशासनाने करण्याचे निर्देश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तर, विभागस्तर युवा महोत्सव २०२३-२४ च्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे, कृषीचे उपसंचालक डी. एस. घोलप, क्रीडा पोलिस निरीक्षक राजेंद्र काळभोर, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी डॉ. सुभाष दळवी, शिक्षण निरीक्षक रा. दि. पाटील, महाराष्ट्र ऑल्मिपिक संघटनेचे  सदस्य गोविंद कुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेकरिता येणारे खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्यासाठी सुरक्षित निवासव्यवस्था आणि खेळाची चांगली मैदाने उपलब्ध करण्यात यावी. अशा सुरक्षित ठिकाणांची परवानगी प्रशासनाने घ्यावी. या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट आयोजन करावे. जिल्हा व विभागस्तर युवामहोत्सव २०२३ साठीही खबरदारी घेवून जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. कोणत्याही स्पर्धेसाठी येणारे खेळाडू आणि युवा महोत्सवासाठी सहभागी होणारे स्पर्धक आणि शिक्षक यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिल्या.

दादर येथे मुंबई शहरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव १३ डिसेंबरला

मुंबई शहरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव १३ डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्र स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र, दादर येथे आयोजित केला जाणार आहे.  या महोत्सवाकरिता प्रत्येक विभागासाठी परीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा महोत्सवमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवकांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक, कौशल्य विकास, विविध कृती व तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यावर्षी या स्पर्धेत सहभागी युवकांना शासनाकडून रोख बक्षिस देण्यात येणार आहे. मुंबई विभागातील विजेते युवा हे बालेवाडी पुणे येथे २० डिसेंबर २०२३ रोजी होणा-या युवा महोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी यावेळी बैठकीत दिली.

0000

 

 Source link

Leave a Comment