राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी


नाशिक, दिनांक 9 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेस क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्यने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिक शहरातील विविध भागातील २२०० पेक्षा अधिक रूमची व्यवस्था केली आहे. निवासाच्या ठिकाणापासून कार्यक्रमाच्या स्थळांपर्यंत ये – जा करण्याची वाहन व्यवस्था करण्यात आली  आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग मैदानात हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून येथून ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत. नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेने युवा महोत्सवासाठी युद्ध पातळीवर तयारी केली आहे. तपोवन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, “देशातील विविध कोनाकोपऱ्यातून सुमारे ७ हजार ५०० युवक सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवात राज्यभरातून ३६०० युवक, २५०० स्वयंसेवक, ४०० आमंत्रित स्वयंसेवक आणि १००० युवक सहभागी होणार आहेत.  कलेच्या सादरीकरणासह ५०० युवक आणि संशोधकांसाठी एक विशेष मंच दिला जाणार आहे. युवा महोत्सवासाठी १ लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती  क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

या महोत्सवात 12 ते 16 जानेवारी दरम्यान शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांस नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी केले आहे.

यावेळी उपस्थित पत्रकारांशी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी  राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगानाने चर्चात्मक संवाद साधला.

000



Source link

Leave a Comment