राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु


मुंबई, दि.३० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री श्री.आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रेल्वे विभागाच्या जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टयांचे पुनर्वसन करणे, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंगीकृत्त उपक्रम महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्यौगिकी मर्या. (महाप्रित) यांच्या विविध योजना, स्कॉलरशिप योजनेमध्ये ॲटोरिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी यावेळी सादरीकरण करून विविध योजनांची माहिती करून दिली.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे,मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) वंदना कोचुरे यांच्यासह गृह विभाग, नगरविकास विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, विधि व न्याय विभाग,  संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Comment