राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न


पुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्रनिर्मितीची किल्ली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस  यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२३ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.महेश काकडे, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.विजय खरे आदी उपस्थित होते.

a8a418e1 6345 4851 af61 10aaf32d8181

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. उच्च शिक्षणाचे महत्व वाढत असतांना देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विविध विभागांनी अधिक संवेदनशीलतेने अभ्यासक्रम आणि नव्या शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रीत करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

7f9f0997 7ce6 45c5 87ad ad64fa3e3581

ज्ञान केवळ माहितीचा संग्रह नसल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, ज्ञानाच्या आधारे नवसंस्कृती उभी राहते, ज्ञानामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो. ज्ञान नाविन्य आणि परिवर्तनाचे उत्प्रेरक आहे. ज्ञान माणसाला योग्य निर्णय घेण्यास सक्षम आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यायोग्य बनविते. ते प्रश्न विचारणे, विश्लेषण करणे आणि मूल्यांकन करण्यासाठी माणसाला प्रोत्साहित करते. ज्ञान वर्तमान आणि भविष्याला जोडणारा सेतू असल्याने उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करून विद्यार्थी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत  योगदान देऊ शकतील, असा विश्वास श्री.बैस यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुशल मनुष्यबळाची खाण असून उद्याचे धोरण निर्माते आणि देशाचे नेतृत्व येथून घडेल, असेही राज्यपाल म्हणाले.

 

डॉ.सहस्रबुद्धे म्हणाले, सध्याच्या विद्यापीठीय वातावरणात संस्था बांधणी या विषयाची होत असलेली उपेक्षा संपविण्याची आणि नव्या आणि काल सुसंगत ज्ञाननिर्मितीसाठी अपारंपरिक पद्धतीची दृष्टी ठेवून नव्या ज्ञान विषयांवर काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठीय शैक्षणिक वर्तुळात अस्सल प्रागतिकतेचे संस्कार रुजविण्याचीदेखील गरज असल्याचे ते म्हणाले.

कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यापीठ देशपातळीवर आघाडीवर आहे. पायाभूत आणि ज्ञान शाखांचे सक्षमीकरण करणे, सर्वसमावेशक शिक्षणाची कास धरणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पदक देऊन गौरविण्यात आले. समारंभात ८५ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र,  १९ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २२६ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, १८७ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ४ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र अशा एकूण १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, स्नातक उपस्थित होते.

०००



Source link

Leave a Comment