‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे

‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे

मुंबई, दि. 15 : राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहेत.  रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासन 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या एक महिन्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे. या अभियानाचा रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आणावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, परीवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंग, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रविण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा उपस्थित होते.

xRoad Safety Campaign 2024 1 1 1024x683.jpg.pagespeed.ic. 8Jd2nhTiR

रस्ता सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले की, रस्ता सुरक्षेचे संस्कार लहान वयातच बिंबविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा विचार आता करावा लागेल. राज्यात होत असलेल्या अपघातांमध्ये 60 टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात यावी. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र आता चित्र बदलत आहे. अनेक नागरिक पुढे येवून ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार देवून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवित आहेत. रस्ता सुरक्षेबाबत उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार निधीची उपलब्धता होत आहे.

 

जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजनमधून अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करणे, जनजागृती आदींसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे. परिवहन महामंडळाप्रमाणे चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी मोहिम राबवावी.  रस्ता सुरक्षा मोहिमेच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमात अपघातांचे प्रमाण यावर्षीच्या तुलनेत निश्चितच कमी होण्याची अपेक्षाही मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली.

 

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे – दीपक केसरकर

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. स्पीड गनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणावे, त्यामुळे निश्चितच अपघात कमी होतील. चालकांनी कटाक्षाने वाहतूक नियम पाळावेत.  नागरिकांना  शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे  हे शासनाचे उद्दिष्ट नाही, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले,  परिवहन विभाग 37 सेवा फेसलेस पद्धतीने देत असून या सेवांचा आतापर्यंत 68 लाख 61 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. अपघात कमी करण्यासाठी विभाग अधिक प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.

यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत अपघातामध्ये लक्षणीय घट होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबई शहर आणि उपनगर, चंद्रपूर व नवी मुंबई येथील परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा रस्ता सुरक्षेबाबत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.   तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूतांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यामध्ये खोपोली जि. रायगड येथील गुरूनाथ रामचंद्र साठीलकर व विजय सुरेश भोसले, खालापूर जि. रायगड येथील मो. हनिफ कर्जीकर, वर्धा येथील वायरलेस विभागातील हवालदार शशिकांत गजबे, मोटार वाहन निरीक्षक कराड येथील  श्रीमती प्रसन्ना पवार यांचा समावेश आहे. मुंबई ते पुणे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुनलेत 32 टक्के अपघात कमी केल्याबद्दल उप परिवहन आयुक्त भरत कळसकर, पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांचा गौरव करण्यात आला आहे. यासोबतच सहा. परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, परिवहन उप आयुक्त (प्रशासन) संजय मैत्रेवार, परिवहन उप आयुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांचा विशेष कामगिरीसाठी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा पुस्तिका आणि वेस्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मृण्मयी भजक यांनी, तर आभार प्रदर्शन अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

इंटरसेप्टर वाहनांचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे वाहन असलेल्या इंटरसेप्टर वाहनांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया उपस्थित होते. विभागाला 187 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात 5 वाहनांना ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.

 

००००

निलेश तायडे/विसंअ/

Source link

Leave a Comment