नाशिक दि. १३ (जिमाका): आपल्या देशाला विविध नाट्य, नृत्य परंपरा लाभल्या असून त्यामुळे देशाची जगात एक वेगळी ओळख आहे. या शास्त्रीय व लोकनृत्य परंपरेचे युवकांनी जतन करून त्या पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आज महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या लोकनृत्य समुह व वैयक्तिक नृत्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह राज्यातील विविध मान्यवर व युवक उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, भारतीय नृत्यकला ही संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. तसेच मानवी मनातील भावना कथा स्वरूपात नृत्यातून दाखवण्याची कला शास्त्रीय व लोकनृत्यात आहे. शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम, कुचीपुडी, कथकली, ओडिसी, मणिपुरी, सत्रिय अशा या आठ महत्त्वाच्या शास्त्रीय नृत्याचे प्रकार देशात विविध राज्यात प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय व लोकनृत्य ही दोन्ही नृत्य भारतीय संस्कृती, परंपरेचं दर्शन घडवित असतात. युवा महोत्सवासाठी आलेल्या विविध राज्यातील युवकांनी नाशिकमधील पर्यटन व खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही मंत्री डॉ. पवार यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध राज्यातील शास्त्रीय व लोकनृत्यांचे सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर करण्यात आले.
०००