‘मुंबई फेस्टीव्हल २०२४’ संदर्भात पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली मुलाखतीतून माहिती


महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित करण्यात आला आहे.

देशातील आणि परदेशातील लोकांना मुंबईचे आकर्षण असून या फेस्टीव्हलच्या माध्यमातून राज्याच्या संस्कृतीची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी  ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ एक व्यासपीठ ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदशनाने या फेस्टीव्हलचे उत्कृष्ठ नियोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती देखील अविरतपणे काम करत आहे. मुंबई फेस्टीव्हल राज्यात प्रथमच आयोजित केला जात आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://mumbai-festival.com/ येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

फेस्टीव्हलमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, याबाबत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी पर्यटन फेस्टीव्हल संदर्भात सविस्तर माहिती या मुलाखतीत दिली आहे.

‘मुंबई फेस्टिव्हल 2024 चे प्रथमच आयोजन करण्यात येणार आहे, फेस्टिव्हलच्या या संकल्पनेबाबत काय सांगाल ?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून प्रमुख व्यापारी केंद्र आहे. देश-विदेशातील लोकांमध्ये मुंबई शहराबद्दल तसेच इथल्या बॉलीवूडबद्दल विशेष आकर्षण आहे. मुंबई शहरास दररोज हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक, व्यवसायिक भेटी देत असतात. राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे मुंबईत शहर व उपनगरातील विविध विभागात आयोजन करण्यात येणार आहे.

खाजगी उद्योजक आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे, याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येणार आहे

मुंबई महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये विविध विभागांचे शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यक्रम संयोजकाच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई फेस्टिव्हलमध्ये संगीत प्रदर्शनचित्रनगरी, बीच फेस्ट आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाणार आहे याबद्दलही सांगा

या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी क्रीडा उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम उदा. सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्,  पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये होणारा ‘मुंबई वॉक’ ही संकल्पना काय आहे

‘मुंबई वॉक’ हा एक ‘फॅशन शो’ कार्यक्रम असून यामध्ये बॉलीवूड सेलीब्रेटी सोबत मुंबईच्या दैनंदिन जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असलेले मुंबई डब्बेवाले, टॅक्सीचालक, बेस्ट चालक आणि वाहक, पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सफाईगार इत्यादींना कार्यक्रमात सहभागी करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल’ हे आहे.

याबद्दल जाणून घ्यायला आवडेल

या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांना सहभागी करुन घेण्यात येत असून दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर यामध्ये सहभागी होणाऱ्या विविध शॉपिंग मॉल, नाईट मार्केट व महत्त्वाच्या रिटेल ऑऊटलेटच्या माध्यमातून खरेदीवर ग्राहकांना विशेष सूट तसेच आकर्षक बक्षीस योजना उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तरूणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये काय संधी आहे

या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी क्रीडा उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम उदा. सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्,  पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी हस्तकला, मुंबई एक्स्पो, फूड कोर्ट, गाईडेड सीटी टूर इत्यादींच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक व तरुण वर्गाला सहभागाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या फेस्टिवलमध्ये स्थानिक प्रशासनाला आपण कशाप्रकारे सहभागी करून घेतले आहे

मुंबई महोत्सवाच्या  नियोजनपूर्वक आयोजनासाठी विविध शासकीय विभागांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासन इत्यादींचा समावेश असून त्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक ती परवानगी, कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्रदेश विकास प्राधिकरण यांचे सहकार्य तसेच महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस व वाहतूक व्यवस्था व पार्कींगसाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तसेच कोणताही अनुचित अपघात घडू नये यासाठी मुंबई अग्नीशमन यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची मदत घेण्यात येणार आहे.

मुंबईतील पर्यटनाला चालना देणे आणि या ठिकाणी असणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास करणे यासाठी विभागामार्फत कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्धी मोहीम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच बॉलीवूड टूरीझम, मुंबईतील युनेस्को हेरिटेज स्थळे, दक्षिण मुंबईतील वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या  इमारतींच्या प्रसिद्धीसाठी हेरिटेज वॉक, गेटवे ऑफ इंडिया येथे लाईट ॲण्ड साऊंड शो, उपनगरातील गोराई येथील विपश्यना सेंटर, कान्हेरी कॅव्हज्, गिलबर्ट हिल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुहू चौपाटी इत्यादी पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिद्धी करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच खाजगी सहल आयोजकांच्या माध्यमातून मुंबई दर्शन व बॉलीवूड टूर या सहलींचे देखील आयोजन करण्यात येते.

मुंबई फेस्टिवल हा जागतिक पातळीवर पोहोचावा याच्यासाठी कशाप्रकारे प्रसिद्धी करण्यात येत आहे

मुंबई महोत्सवाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यापक प्रसिद्धीसाठी  प्रयत्न करण्यात येत आहेत. महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी नामांकीत वृत्तपत्र समुह व दूरचित्रवाहिनी यांना मीडिया पार्टनर म्हणून देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे.

मुंबई मॅरेथॉन आणि ‘काळा घोडा कला महोत्सव’ यांचे आयोजक देखील या फेस्टिवलमध्ये सहभागी आहेत. मुंबईमध्ये नावाजलेल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या महोत्सवामध्ये सहभाग असणे ही अभिमानाची गोष्ट आहे आपण काय सांगाल याबद्दल

मुंबई मॅरेथॉन व काळा घोडा महोत्सव हे दोन कार्यक्रम मुंबईमधील नामांकित तसेच सर्वसामान्यांच्या आकर्षणाचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी होत असतात. हे कार्यक्रम हे जानेवारी मध्येच आयोजित होत असल्यामुळे त्यांना या महोत्सवाचा एक भाग म्हणून सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमांना देखील व्यापक प्रसिद्धी देऊन त्यामाध्यमातून स्थानिक तसेच पर्यटकांना त्याचा लाभ घेणे शक्य होईल.

या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी काय आवाहन कराल?

या फेस्टिवलसाठी सर्वांना सहभागी होता येणार आहे का याच्यासाठी प्रवेश शुल्क आकारले आहे का ?

या महोत्सवात सर्व मुंबईकर व पर्यटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर जावून २० ते २८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करावी. तसेच सदर महोत्सवा दरम्यान शॉपिंग मॉल, रिटेलशॉप, नाईट मार्केट व मुंबई एक्स्पो इत्यादी ठिकाणी प्रवेश नि:शुल्क असेल. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी माफक शुल्क आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे.

००००

शब्दांकन-संध्या गरवारे

सहायक संचालक,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय



Source link

Leave a Comment