‘मुंबई फेस्टिवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण
मुंबई, दि. १५ : ‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन केले आहे या फेस्टिवलचे जपानच्या संसदेतील सदस्यांना पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी निमंत्रण दिले.
चर्चगेट येथील ॲब्मेसिडर हॉटेल येथे वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी यांच्यासह सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी, भारत जपान मैत्रीसंघाचे अध्यक्ष निजीमा ताकेशी, भारत जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे संसदेतील उपाध्यक्ष फुजीयामा मासाकी, भारत जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे प्रचार समितीचे उपाध्यक्ष हिरोइको युवात, सरचिटणीस तेसुया कवाबटा, कार्यकारी संचालक ताकेती सातो, संसद सदस्य होरी तास्तुओ, सदस्य अकीझुकी फुमीनारी, तोकीशा सुझुकी, मिसू टाकूया, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशोओ, सचिव तिटाझुमे ताकाहिरो यावेळी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे देखील आहेत. राज्यातील गड किल्ले इतिहासाचे साक्ष देतात, जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र माहिती व्हावा यासाठी नक्की राज्याला भेट द्यावी, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईची ही ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी, दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन केले जात आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईच्या संस्कृतीची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवात महाएक्सपो, पर्यटन परिषद, शॉपिंग फेस्ट, काळा घोडा फेस्टीवल, बीच फेस्ट, योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप, मेरेथॉन, संगीत महोत्सव, क्रिकेट, साहसी क्रीडांचा देखील समावेश असल्याची माहिती जपान मधील सदस्यांना यावेळी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात परदेशी पर्यटक यावेत त्याचप्रमाणे परदेशातही आपल्या पर्यटकांना जाताना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/