राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण; ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप
मुंबई दि.२३ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कोकण विभागात १४९, नाशिक विभागात १ हजार ७०, पुणे विभागात २ हजार ९०७, कोल्हापूर विभागात ७०८, छत्रपती संभाजीनगर विभागात ४७४, लातूर विभागात २९०, अमरावती विभागात १८७ आणि नागपूर विभागात २८७ असे राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेसाठी ४१ कोटी ६० लाख ६५ हजार ४९५ रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.
तसेच अद्यापही ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ