महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न


मुंबई, दि.२६: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही  ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

एमएमआरडीए मैदान, वांद्रे (पूर्व)  येथे ‘महालक्ष्मी सरस’ २०२३-२४ या  बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्धघाटनानंतर ग्रामविकास मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापकीय संचालक रेमंड डिसोजा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. पी. पाटील, उपायुक्त विकास कोकण विभाग गिरीश भालेराव, ग्रामविकास विभागातील अधिकारी,  महिला बचत गटाच्या सदस्य यावेळी उपस्थित होत्या.  महालक्ष्मी सरस उद्घाटन 2

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ मध्ये स्टॉल मिळावा यासाठी महिला आग्रही आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आता महिला बचत गटांमध्ये देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बचतगटांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे. यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन 25 कोटी रुपयांच्यावर वस्तूंची विक्री होईल. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्याबाबत  विचार करणार असून याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सहा लाख बचतगटांना सन 2022 -23 मध्ये सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. तर यामध्ये वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्ज वितरण पुरवठा 7 हजार कोटी पर्यंत बचतगटांना कर्ज मिळाले आहे. महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रमाण हे 98 टक्के आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणापेक्षा महिला बचत गटांनी केलेली कर्ज परतफेड सर्वात अधिक आहे, असेही मंत्री श्री. महाजन म्हणाले.

महालक्ष्मी सरस उद्घाटन 4

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी देशात प्रभावीपणे केली आहे. महिलांचे परिश्रम कमी व्हावेत यासाठी उज्ज्वला गॅस योजना, प्रत्येक वाडीपर्यंत रस्ते, प्रत्येकाला राहण्यासाठी घरकुल, प्रत्येक घरामध्ये शौचालय, गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य वितरण यासारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. आज अनेक बचतगटांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोटी रुपयांचे कर्ज मिळत आहे. बचत गटांच्या प्रामाणिकपणाचे हे यश आहे. बचतगटांनी तयार केलेले उत्पादन जागतिक बाजारपेठेत टिकले पाहिजे.

महालक्ष्मी सरस उद्घाटन 3

प्रधान साचिव श्री.डवले म्हणाले, बचत गटांकडून घेतलेले कर्ज फेडीचे ९८ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे बचत गटांना बँका कर्जपुरवठा करण्यास नेहमी उत्सुक आहेत. पंतप्रधान आवास योजना, विकसित भारत त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबवत आहोत याचा लाभ बचतगटांना होत आहे. बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे.

नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डिसोजा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक श्री. राऊत यांनी आभार मानले.

 महालक्ष्मी सरस  प्रदर्शन व विक्री ८ जानेवारी २०२४ पर्यंत

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्राम विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना एक उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजिविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ०४० स्वयं सहायता समूह, ३१ हजार ३७०  ग्रामसंघ, १ हजार ८५० प्रभागसंघ, ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ४१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. सुमारे ६० लाखांपेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्य, विभाग व जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समूहांतील सदस्यांना विवीध राज्यातील उत्पादने, विक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावरान वस्तू आणि पदार्थ उपलव्ध करुन देणे हा आहे.

यावर्षी महालक्ष्मी सरस मध्ये एकूण ५१३ स्टॉल असून, महाराष्ट्रातील २५५, देशभरातून येणारे इतर राज्यांचे ११८ आणि नाबार्ड चे ५० उर्वरित स्टॉल हे नावीन्यपूर्ण प्रकारचे  आहेत. यावेळी महाराष्ट्रातून जी उत्पादने येत आहेत त्यामध्ये त्या -त्या जिल्ह्यांची ओळख सांगणारे उत्पादने आहेत. मुंबईकरांना या प्रदर्शनातून खात्रीचा माल किंवा वस्तू मिळतील देशभरातील अस्सल चवी  चाखण्यास मिळतील, कलाकुसर अनुभवायला मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण महिलांच्या या प्रयत्नांना हातभार  लागणार आहे.  वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ८ जानेवारी २०२४ पर्यंत असलेल्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 



Source link

Leave a Comment