नवी दिल्ली, 16 : ‘जाणता राजा, मामाच्या गावाला जाऊ या, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन मुलींना विभागून देण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल, शिक्षीका भावना बावने, सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.
या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होते.
000000
अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 09 /दि. 16.01.2024