मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन


मुंबई, दि. ३० – राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व कार्यालयांमधून मराठी भाषेसंबंधी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिर, कविसंमेलन, नाट्य, घोषवाक्य, अभिवाचन, कथाकथन, पुस्तकांचे रसग्रहण, वादविवाद यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करावे. याशिवाय मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध माध्यमांतून याबाबतचे दृक श्राव्य संदेश प्रसारित करावेत. ग्रंथ प्रदर्शन, दिंडी, पुस्तक भेट देणे, पुस्तक जत्रा, समाजमाध्यमांवर मराठी वाचन कट्टा आदी उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई बुक, ऑनलाईन विक्री, लेखक प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, माहितीपट लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मुंबई मराठी साहित्य संघ आदी साहित्य सस्थांची मदत घेता येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.Source link

Leave a Comment