मुंबई, दि.४ : भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मराठी माणसाने रचलेला असून आशयसंपन्न चित्रपटांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्यावतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची समिती गठित करुन या कामास गती द्यावी. तसेच नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.
मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे, पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.
मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.
विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे. अनेक प्रतिथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी , असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
तसेच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, क या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठित करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.
००००