नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा): महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतच होत असते. या बाल महोत्सवाचा बालकांनी आनंद घ्यावा, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2023-24 च्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, माजी आमदार जयंत जाधव यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व बाल महोत्सवात सहभागी झालेले मुले व मुली उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुलांना अभ्यासासोबतच कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवता यावे यासाठी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात. तसेच त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळण्यासाठी बाल महोत्सव व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या अतिवापरामुळे पालक व मुलांमधील संवाद कमी झाला आहे, कमी झालेला हा संवाद वाढविण्यासाठी विभागाच्यावतीने स्पर्धा, महोत्सव अशा विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांना लहानपणापासूनच अभ्यासासोबतच त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यास, त्यांचा मानसिक व शारीरीक विकास होण्यास मदत होते. या बाल महोत्सवाच्या माध्यमातून आनंद घेतांना मुलांना कोणतीही दुखापत होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे ही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंडित जवाहरलाल नेहरू व सावित्रीबा़ई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात अनाथ प्रमाणपत्र व माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच बेटी बचाव, बेटी पढाओ या दौड टी-शर्ट व टोपी लोगोचे अनावरण करण्यात आले. हवेत फुगे सोडून चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.