प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार


बारामती, दि.२१:  राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्रजी माध्यम शाळा येथे आयोजित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडावर्धनी क्रीडा करंडक २०२३-२४ पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, क्रीडावर्धनीचे अध्यक्ष विजय भालेराव, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

3c7d62a3 4df8 44ca 8133 3813684c17c9

श्री.पवार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके जिंकण्याचे प्रमाण कमी आहे. शालेय जीवनाच विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन केल्यास ते विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून देतील. राज्यातील अधिकाधिक खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर क्रीडा संकुलात पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यांचे मनोबल उंचवावे यासाठी पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

82361cc6 cf59 4ab2 a084 b8c22fea3916

विद्यार्थ्यांचा अंगी असलेल्या क्रीडागुणांचा उपयोग करुन घ्यावा

महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रातही चांगली परंपरा आहे. स्व. खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल, यासाठी शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

शालेय स्पर्धा आयोजित करतांना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता निवास, जेवण, स्वच्छतागृह अशा गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या अंगी क्रीडा कौशल्य असते, त्याचा उपयोग करुन घ्यावा. स्पर्धा निकोप पद्धतीने झाल्या पाहिजेत, खेळाडूवृत्तीने खेळल्या गेल्या पाहिजे. यशानी हरळून तसेच अपयशाने खचून  जाऊ नये, असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला.

b7463a9a e949 49d5 98a4 594b9e3cdd31

झोपडपट्टी मुक्त बारामती करण्याचा मानस

काळानुरूप बारामती शहरात आमूलाग्र बदल होत असताना आरोग्य, क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात विविध शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आल्या असून याचा नागरिकांनी आपल्या मुलामुलींना लाभ घ्यावा. नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी चांगल्या प्रकारच्या इमारती, क्रीडांगण, उद्याने, वाचनालय देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये त्रुटी राहात राहता कामा नये, याबाबत दक्षता घेतली जात आहे. आगामी काळात झोपडपट्टी मुक्त बारामती करण्याचा मानस आहे, असेही श्री.पवार म्हणाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्यावतीने अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य

स्व. हरिभाऊ देशपांडे यांचा शैक्षणिक दृष्टिकोन नेहमी सकारात्मक होता. त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या येथील शाळेसाठी मदत केली. सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमाची अतिशय नावाजलेली शाळा म्हणून ही शाळा ओळखली जात होती. या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेऊन ते विविध क्षेत्रात यशस्वी झाले. या संस्थेच्यावतीने बारामती परिसरात अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करण्यात येत असून संस्थेचे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजे. या संस्थेची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून याचा बारामतीकरांना अभिमान आहे. या शाळेची नवीन इमारत उभी करतांना आगामी ५० वर्षाचा विचार करता सर्व सुविधानीयुक्त आराखडा तयार करावा. माजी विद्यार्थी या नात्याने आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले, खेळामुळे व्यक्तींच्या सर्वांगीण विकास होते. याच बाबीचा विचार करुन सोसायटीच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.  बारामतीचा शैक्षणिक दर्जा अबाधित राहण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील.

श्री. भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

4574917c 9e2f 4019 9ff3 6fed6a56ce2f

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विजेत्या शाळेला पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच क्रीडा करंडक विषयी माहिती देणाऱ्या ‘क्रीडावेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

००००



Source link

Leave a Comment