निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी नियमांची माहिती आवश्यक


छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- निवडणुका निर्भय व निष्पक्ष होण्याची जबाबदारी ही  प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेवर असते. त्यासाठी निवडणुक विषय विविध कायदे व नियमांचा अभ्यास असणे आवश्यक असते. या नियम व मार्गदर्शक सुचनांमध्ये वेळोवेळी सुधारणा होत असतात. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती व अभ्यास असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आज येथे केले.

निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. आर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात विभागातील आठही जिल्ह्यातील १२७ नोडल अधिकारी सहभागी झाले होते.

क़या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर डॉ. विकास मीना, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपायुक्त जगदीश मिनीयार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच विभागातील सर्व नोडल अधिकारी, सर्व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

श्री.आर्दड म्हणाले की, आपण या पूर्वी केलेल्या निवडणूक कामाचा अनुभव असला तरी त्यावेळचे नियम आणि आत्ता सुधारणा झालेले नियम यांचा अभ्यास करा.या प्रशिक्षणात अशा सर्व नियमांचा आणि त्यात झालेल्या सुधारणांचा समावेश करण्यात आला असून त्याचे प्रशिक्षण राज्यस्तरीय प्रशिक्षक आपणास देणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घ्या. अभ्यास व शंका निरसन करुन आपल्या निवडणूक विषयक कामात अद्यावत व्हावे. जेणे करुन आपणास निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुक प्रक्रिया राबविणे शक्य होईल.

प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च, मिडीया मॉनिटरींग, जाहिरात प्रमाणीकरण, पेड न्यूज इ. बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

दरम्यान विभागीय आयुक्तांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती व प्रात्यक्षिक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.

०००



Source link

Leave a Comment