नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा


सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत चालणार आहे. 18-19 वर्षे वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान घ्यावे. यामध्ये प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग घ्यावा. युथ आयकॉन यांचे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिल्या.

दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष / प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, काही आक्षेप असतील तर ते विचारात घ्यावेत. मतदार यादीमध्ये नावे जोडणे, कमी करणे व सुधारणा करत असताना पारदर्शकता व निष्पक्षपणे काम करावे. कोणत्याही यंत्रणेविरुद्ध तक्रार येऊ नये याची काळजी घ्यावी. या अनुषंगाने एक मोठी जबाबदारी ERO व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांची आहे. त्यासोबत राजकीय पक्षांचेही दायित्व महत्वाचे असून, कामाला गती देण्यासाठी व पारदर्शकतेसाठी त्यांनी बुथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती अपेक्षित संख्येमध्ये तात्काळ करावी. बुथ लेव्हल असिस्टंट बरेचसे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकतो, असे ते म्हणाले.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांचे काही प्रश्न मांडले. यावर अनुषंगिक कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आुयक्त सौरभ राव यांनी दिल्या.

खासदार संजय पाटील यांनी नवमतदार नोंदणीसाठी सेलिब्रेटी किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून आवाहन करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच नवमतदार नोंदणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख 12 हजार 811 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 38 हजार 450, स्त्री मतदार 11 लाख 74 हजार 250 व तृतीयपंथी 111 आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 421 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी बुथ लेव्हल एजंट नियुक्त करावा. काही मदत हवी असल्यास बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा.



Source link

Leave a Comment