दर्पण : समाज प्रबोधनाची नवी दृष्टी


सुप्रसिद्ध माध्यम तज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते. त्यानुसार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्या घटनेचे स्मरण म्हणून राज्यात प्रतिवर्षी ६ जानेवारी रोजी ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो, त्यानिमित्त हा लेख…

१८३२ चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. भारतीय जनतेच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब आपल्या ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून तत्कालिन राज्यकर्त्यांना दिसावे आणि त्याचबरोबर परकीय राज्यकर्त्यांच्या कार्याची ओळख, त्याचे स्वरुप जनतेच्याही लक्षात यावे, असा दुहेरी संवाद दर्पणद्वारे बाळशास्त्रींनी साधला. थोडक्यात सरकार आणि जनता यातील दुवा म्हणून वृत्तपत्रांनी काम करावे या नितीतत्त्वाचे पालन दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्रींनी केले.

दर्पणचे अंतरंग

दर्पण हे पहिल्या वर्षी जवळपास तीनशे- चारशे लोकांपर्यंत पोहोचले. त्याचे वर्गणीदार २८० होते. साधारणत: त्याकाळी एखादे वृत्तपत्र ५० लोक वाचत, असे समजले तरी एकूणच दर्पण जवळपास १२ ते १५ हजार वाचकांपर्यंत पोहोचत असे. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकूराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकूराचा दर्जा उच्च होता. दर्पण पाक्षिकात अर्धा मजकूर इंग्रजी तर अर्धा मराठी असे. तसेच डेमी आकाराची ८ पाने दोन कॉलम मजकूरासह यात असत. सरकार आणि जनता या दुहेरी संवादासाठी हा दोन द्विभाषिय मजकूर असे. दर्पणला त्यावेळी मोठी प्रतिष्ठा मिळाली. अगदी मुंबईत प्रसिध्द होत असलेल्या तत्कालिन इंग्रजी, गुजराथी, बंगाली भाषेतील वृत्तपत्रांमध्येही दर्पणमध्ये प्रसिध्द झालेली लेख, वृत्ते पुनर्प्रकाशित होत असत. २६ जून १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. पुढे बाळशास्त्रींनी दिग्दर्शन हे मासिकही सुरु केले.

स्त्रीमुक्तीचे प्रणेते

दर्पणकार हे स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या दर्पण या पत्रातून मांडलेले स्त्रीमुक्तीविषयक विचार हे त्यांच्या प्रगमनशील सामाजिक सुधारणा विचाराचे प्रतीक होते. त्यांनी स्त्रीप्रथा बंदीचे स्वागत केले. तसेच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. स्त्रियांची अवनती होण्याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव हे होय, हे त्यांनी अचूकपणे ओळखले होते. तसेच सतीची चाल, बालविवाह, बालविधवा पुनर्विवाह, बालहत्या अशा सामाजिक प्रश्नासाठीही त्यांनी मोठे प्रयत्न केले. ६ जून १८३४ च्या दर्पणमध्ये “दूराग्रही चालीवर झोड” या मथळ्याचे पत्र लिहिले. त्यात स्त्री शिक्षणाचे विचार स्पष्टपणे मांडले. तर १८६७ मध्ये एका अंकात त्यांनी बालविधवांच्या समस्येवरही आपले विचार समर्थपणे मांडले आहेत. एकूणच त्यांच्या स्त्रीमुक्ती विचारांचा परामर्श घेतला असता आपल्याला त्यांच्या प्रगत सामाजिक विचारांचे यथार्थ ज्ञान होऊ शकते.

पत्रकारिता : शैली व अभिव्यक्ती

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या वृत्तपत्रीय लेखनाची अभिव्यक्ती ही जिवंत आणि प्रवाही ठरते. त्यांच्या शैलीदार अभिव्यक्तीची विविध वैशिष्ट्ये आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मध्ये सत्य आणि वस्तुनिष्ठतेवर भर दिला. त्यांच्या मते जे शुद्ध मनोरंजन इच्छितात त्यांचे समाधान दर्पण मधील लहान लहान गोष्टींमुळे होईल. सातारचे सती प्रकरण असो की, विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न असो अथवा जातिभेदाचा प्रश्न असो, आचार्य बाळशास्त्रींच्या लेखणीने तलवारीच्या पात्याचे रुप धारण करत परखड विवेचन केले. निर्भीड मतप्रतिपादन हा जांभेकरांच्या शैलीचा आणखी एक स्थायिभाव होता. पत्रकारितेचे श्रेष्ठ संकेत व मूल्ये जांभेकरांनी विचारपूर्वक जपले. जांभेकरांनी उपयुक्ततावादी आणि उदारमतवादी दृष्टीकोनातून स्वतंत्रपणे विचार मांडले आणि प्रगत विलायती समाजातील नव्या कल्पना स्वभाषेतून आपल्या वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रातील इंग्रजी अमलातील ज्ञानाचा नवा प्रकाश म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर होत. भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान १८३४ यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. शिक्षण विभागाचे संचालक झाले. तसेच त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित,खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. याचबरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथही लिहिले आहेत. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. त्यांच्या रचनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाला एक नवे वळण लाभले. त्यांच्या या महत कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला.

१९२ वर्षापूर्वी आचार्य बाळशास्त्रींनी दर्पणच्या रुपाने जो समाज प्रबोधनाचा वृक्ष लावला तो आज प्रचंड वाढला आहे. महाराष्ट्रात वृत्तपत्र क्षेत्रात झालेली अभूतपूर्व क्रांती ही त्याचाच प्रत्यय आहे. आचार्य बाळशास्त्रींच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…
00000

डॉ.राजू पाटोदकर
उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणेSource link

Leave a Comment