‘डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार’ सर्वंकष करण्यासाठी योजनेत सुधारणा


मुंबई, दि. १० : उत्कृष्ट कार्य करणारी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, स्त्री व जिल्हा रूग्णालये, खाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ २६ फेब्रुवारी शासनातर्फे देण्यात येतात. या पुरस्कार योजनेत सुधारणा करण्यात येत असून पुरस्कार सर्वंकष करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

डॉक्टरांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आग्रही आहेत. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या धोरणांमधून पुरस्कार सर्वंकष करण्यात आले आहे. पुरस्काराने गौरविल्यानंतर अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोविडसारख्या साथरोग काळात डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांचे जीव वाचविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.

राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट डॉक्टर व सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टर, सर्वोत्कृष्ट उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रूग्णालय, स्त्री रूग्णालय, स्वयंसेवी संस्था, मानसिक आरोग्य केंद्र, कर्करोग रूग्णालय,  ग्रामीण, कुटीर, उपजिल्हा यापैकी सर्वोत्कृष्ट असे एक रूग्णालय पुरस्कार देण्यात येतील. अशापद्धतीने जिल्हास्तरावरही पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यामध्ये संचालक आरोग्य सेवा मुंबई व पुणे, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा (रूग्णालय) मुंबई, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार आहे. तर सदस्य सचिव हे आरोग्य सेवा राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक असणार आहे.

विभागीय स्तरावर निवड समितीमध्ये संबंधीत आरोग्य मंडळाचे उपसंचालक अध्यक्ष, डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, महिला डॉक्टर प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी, मंडळ कार्यालयातील सहाय्यक संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य असणार आहे. तर आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सदस्य सचिव असणार आहे.

स्वयंसेवी संस्थेच्या निवडीसाठी राज्यात कार्यरत असणारी, धर्मदाय आयुक्तांकडे किमान पाच वर्षापूर्वी नोंदणी केलेली, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लगतचे किमान पाच वर्ष भरीव सहभाग असलेली, सनदी लेखापालमार्फत लगतच्या किमान तीन वर्षाचे लेखापरीक्षण केलेली, आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग असणारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व समुपदेशन या क्षेत्रात काम केलेले असणारी, दुर्बल घटकांसाठी दुर्गम भागात आरोग्य विषयक उपक्रम, आरोग्य शिक्षण विषय उपक्रम राबविलेली, एड्स, कर्करोग आदी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर व राज्यात काम केलेले संस्था असावी.

वैयक्तिक पुरस्कारासाठी किमान दहा वर्ष अखंड सेवा, संस्था रूग्णालय त्यांच्या कामांमध्ये उल्लेखनिय सहभाग, आरोग्य शिक्षण उपक्रमात सहभाग असायला पाहिजे. पुरस्कारार्थींना राज्यस्तरीय कार्यक्रमात स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.

*****

नीलेश तायडे/विसंअ/Source link

Leave a Comment