टंचाई निवारणासाठी पूर्वनियोजन आवश्यक – डॉ. विजयकुमार गावित


नंदुरबार, दि. 18 (जिमाका वृत्त) – यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसाठा कमी होत असून नंदुरबार तालुक्यास आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात नंदुरबार तालुका पाणीटंचाईबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तहसिलदार नितीन गर्जे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, प्रभारी तहसिलदार राहुल मोरे उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, केंद्र सरकारच्या निधीतून हर घर जल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी दिले जात आहे. ही योजना युद्धपातळीवर राबवली गेल्याने प्रत्येक गावात ही योजना पूर्णत्वास येत आहे. एकही घर पाण्याविना राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक गावात मुबलक पाण्याचे स्रोत बघून त्यातून पाणी दिले जात आहे. ज्या गावात पाण्याचे स्त्रोत कमी आहे किंवा पाण्याचे स्रोत नाहीत अशा गावांमध्ये मुबलक पाणी असलेल्या विहिरी किंवा विंधन विहिरी अधिग्रहित करून त्यातून पाणी दिले जाणार आहे.  तसेच विहिरी खोलीकरण करणे, अधिग्रहित करणे, विद्युत जोडणी करणे, विंधन विहिरी करणे अशी टंचाईबाबतची कामे प्राधान्याने करण्यासाठी या कामांचे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी.

या बैठकीत मंत्री डॉ. गावित यांनी गावनिहाय टंचाईची सद्यस्थिती व टंचाई भासल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, विहीरी, विंधनविहिरी अधिग्रहण, नवीन विहीरी,  विंधन विहिरी, विहीर खोलीकरण, वीज जोडणी, टँकरने पाणीपुरवठा  याबाबत सविस्तर आढावा घेतला.

DSC 9130

आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकाम नवीन पुतळे उभारणीबाबत आढावा..

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात नंदुरबार येथे आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकाम व नवीन पुतळे उभारणीबाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, शहरी विकास प्राधिकरण सहआयुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार नितीन गर्जे, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल, गट विकास अधिकारी जयवंत उगले, प्रभारी तहसिलदार राहूल मोरे, डॉ. कांतीलाल टाटीया आदी संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, नंदुरबार येथे नवापूर चौफुली व धुळे चौफुली येथे नवीन 2 पुतळे उभारणी करावयाचे असून पुतळे उभारणीसाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी.  तसेच पुतळे उभारणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची आजच बैठक घेऊन आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करावी.  पुतळे उभारताना ते निकषात व नियमात बसतील असे उभारावेत.  जेणेकरुन भविष्यात अडचणी येणार नाहीत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.Source link

Leave a Comment