जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर दि. : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी २६० कोटींचा नियतव्यय मंजूर केला असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ३८० कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले. त्याप्रमाणे आगामी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासुद्धा हा आकडा ५०० कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक 2

नियोजन सभागृह येथे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांच्यासह नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीची बैठक 5

सन 2023-24 साठी शासनाच्या मंजूर नियतव्ययापेक्षा तब्बल 120 कोटींची वाढ जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, आगामी आर्थिक वर्षासाठी (सन2024-25) सुद्धा जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये चर्चा करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणेकडून तब्बल 819 कोटी 86 लक्ष रुपयांची मागणी नियोजन समितीकडे प्राप्त झाली आहे. या मागणीला अनुसरून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी 517 कोटी 86 लक्ष रुपयांची निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यात शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, रोजगार या पंचसुत्रीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, नवीन अंगणवाडी बांधकामाचा विषय अतिशय गांभिर्याने घेण्याची गरज असून यासाठी चांगले डिझाईन तयार करावे. तसेच अंगणवाडीमध्ये सर्व संगणकीय व्यवस्था, मॉनेटरिंग सिस्टीम, बांधकामाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. सोबतच शौचालय, स्वच्छता गृह, भोजनकक्ष, संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे. क्रीडांगण विकासासंदर्भात ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवावेत. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करून तेथे महिला आणि पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करावी. सदर काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी क्रीडा विभागाने लक्ष द्यावे. सोबतच वरोरा स्टेडीयमचे नुतनीकरण आणि चंद्रपूरचे तालुका स्टेडीयम घुग्घुसमध्ये करण्याचे नियोजन करावे.

जिल्ह्यात सीसीटीव्ही बाबत पोलिस विभागाने चंद्रपूरचा स्वतंत्र प्लान तयार करावा. तसेच पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, नाईट व्हिजन कॅमेरा यासंदर्भात सुक्ष्म आराखडा तयार करावा. नवीन पोलिस स्टेशन, स्मार्ट सिग्नल याबाबत ‍नियमित पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील खुल्या सार्वजनिक जागांचे संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व खुल्या जमिनीभोवती संरक्षण भिंत बांधावी. त्यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्‍य योजना, आयुष्मान भारत योजना व इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावा, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

०००



Source link

Leave a Comment