‘जाणता राजा’च्या माध्यमातून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होऊया


नागपूर, दि. 11 : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होत आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या आवाहनात म्हणाले की, आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला. शिवराज्याभिषेकाच्या या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहे. अनेक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे सलग तीन दिवस प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत.

येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून या उपक्रमाचा शुभारंभ जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाने होणार आहे. सलग तीन दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या या महानाट्यास सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून शिव विचारांच्या या जागरणामध्ये सहभागी व्हावे. विशेषतः पुढच्या पिढ्यांवर संस्कार होण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित राहावे, हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क राहणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

००००

 



Source link

Leave a Comment