जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, दि. २९ : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागातून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते. स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी गुगल प्ले स्टोअर (Google play store) मधून ‘स्कील इंडिया डिजीटल’ (skillindiadigital) हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष :

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी अभ्यासक्रम

थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रिकलेयिंग, कॅबिनेट मेकिंग, कार पेंटिंग, कारपेंटरी, सीएनसी मिलिंग, सीएनसी टर्निंग, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल रोबोटिक्स, पेंटिंग अँड डेकोरेटिंग, प्लास्टरिंग अँड ड्रायवॉल सिस्टीम, प्लंबिंग अँड हिटिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, फोटो टाईप मॉडेलिंग, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर  कंडिशनिंग, रिनिवेबल एनर्जी, तसेच, एडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी डिजिटल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री ४.० इन्फॉर्मेशन नेटवर्किंग कॅबलिंग,मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन ॲण्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना कळविण्यात येईल. काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा.

०००

मनीषा सावळे/विसंअ/



Source link

Leave a Comment