मुंबई, दि. 30 :- सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक माध्यमातून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन होत असले तरीही गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम आहे. हा गोडवा यापुढेही कायम राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ह्युजेस रोड, गावदेवी, मुंबई येथील स्वर सम्राट सुधीर फडके चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, श्रीधर फडके, महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद महाराज आदी उपस्थित होते.
बाबूजींच्या नावाच्या चौकाचे उद्घाटन करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बाबूजींची मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीते, सदाबहार गाणी हा अजरामर गीतांचा खजिना आहे. बाबूजींनी स्वरबद्ध केलेली गीते आजही रसिक श्रोत्यांच्या मनाला भुरळ घालत असून त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या ओठावर रेंगाळत आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या चौकात निर्माण केलेल्या शिल्पातून सुधीर फडके तथा बाबूजींच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील. बाबूजींचे व्यक्तिमत्व प्रेरक असून ते भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशी व्यक्तिमत्वे कायम मनात जपू या असे आवाहन ही त्यांनी केले. चौकात केलेली बाबूजींच्या शिल्पाची रचना चौकातून जाणाऱ्या-येणाऱ्याला प्रेरणा देईल व चौकात स्वर सम्राटाचे स्वरतीर्थ निर्माण झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बाबूजींनी संगीताची साधना करून रसिकांच्या मनात आपले दृढ स्थान निर्माण केले असल्याचे सांगून मंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेतर्फे या चौकाचे नामकरण केल्याबद्दल महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.
श्री विश्वेश्वरानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी नृत्य कला निकेतन ग्रुपने भरतनाट्यम् सादर केले.