केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी यात्रेचे आयोजन
सातारा, दि. १ : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत फलटण तालुक्यातील सुरवडी येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पार पडली केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. मिश्रा यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकारतर्फे लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांना नसणे या अडथळ्यावर मात करण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरत आहे. ठिकठिकाणी नागरिक मोठा प्रतिसाद देत असून योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी तसेच लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत. नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधकामासाठी अनुदान, जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोड देणारी ‘हर घर जल’ योजना, नागरिकांना वैद्यकीय संरक्षण देणारी आयुष्मान भारत योजना, छोट्या आणि कुशल कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना, महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी गॅस जोडणी देणारी उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना आदी अनेक योजनांचा लाभ देण्यात येत असून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये हाच यात्रेमागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.
खासदार नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित प्रसिद्धी व लाभ देण्याची कार्यपद्धती यात्रेत राबवली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कृषी विभागाच्या योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना, बचत गटाच्या महिलांना धनादेश वाटप, आधार कार्ड अद्ययावतीकरण, आयुष्मान कार्ड काढणे यासह श्री. मिश्रा यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी संकल्प शपथ घेतली.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
०००