केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरांमध्ये पोहोचविणे  हा विकसित भारत संकल्प यात्रेचा ‘संकल्प’ – पालकमंत्री दीपक केसरकर


मुंबई, दि. ०८ : केंद्र शासन पुरस्कृत तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना व्हावी, त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात २८ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे हा ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ चा संकल्प असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शनिवार, दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सी विभागात माधव बाग, कावासजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याचेही पालकमंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक 3

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय)  चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे, नियोजन विभागाच्या संचालक डॉ.प्राची जांभेकर आदींसह सहायक आयुक्त, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड, मुद्रा योजना, आरोग्य, जेनरिक औषधे, उद्योग विभागाच्या विश्वकर्मा आणि एक्सलेटर योजना तसेच सुकन्या समृद्धी योजना, जनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना आदींची माहिती आणि लाभ घरोघरी पोहचविण्यात येत आहेत. या संदर्भात प्रचार-प्रसारासाठी सध्या मुंबई महानगरात चार वाहने फिरत आहेत. या वाहनांसोबत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी योजनांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. तसेच ज्या विभागात यात्रा जाणार असेल, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देखील समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. श्रीमती अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये दहा दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रेची वाहने नागरिकांना विविध योजनांची माहिती देत आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२४ पर्यंत ही वाहने प्रभागनिहाय फिरणार आहेत.

मुंबईकरांना आवाहन ;

गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना योजना समजावून सांगण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आपल्या परिसरात जेव्हा ही वाहने येतील तेव्हा मुंबईकरांनी विविध योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले की, विकसित भारत संकल्प यात्रेसोबत  संपर्क अधिकारी नेमावेत. योजनेची माहिती असलेली माहितीपत्रके घरोघरी वाटपासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले. आतापर्यंत मुंबईमध्ये ७६ ठिकाणी ही यात्रा पोहोचली असून, त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

0000

शैलजा पाटील/विसंअ
 



Source link

Leave a Comment