कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे, दि.५: वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा; त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

xWhatsApp Image 2024 01 05 at 2.13.52 PM.jpeg.pagespeed.ic.Cmp0G1y2Kc

बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनिल तटकरे, आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

xWhatsApp Image 2024 01 05 at 2.13.51 PM.jpeg.pagespeed.ic.biXH9hFbvl

सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आरोग्य सुविधांवर भरीव तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, रुग्ण सेवेसाठी चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टरांचे मानधन वाढविणे गरजेचे आहे. कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जोखीम स्वीकारून रुग्णसेवा केल्यामुळे त्यांचे तसेच वैद्यकीय सुविधांचे महत्त्व समजून आले. या काळात ससून रुग्णालयाच्या उभारणी सुरु असलेल्या नव्या इमारतीचा उपयोगही कोरोना बाधितांवर उपचारासाठी करण्यात आल्याने इतर पायाभूत सुविधा करता आल्या नव्हत्या.

xWhatsApp Image 2024 01 05 at 2.13.53 PM 1.jpeg.pagespeed.ic.2v lOgkel3

ससून रुग्णालयाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुग्णालय इमारतीच्या विस्तारासाठी आवश्यक जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ससून रुग्णालयात काळानुसार आवश्यक बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयातील उत्तम सुविधांचा अभ्यास करून एका महिन्यात आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव सादर करावा. सामान्य रुग्णांसाठी ससून रुग्णालय महत्त्वाचा आधार असल्याने येथे अत्याधुनिक सुविधांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

xWhatsApp Image 2024 01 05 at 2.13.53 PM.jpeg.pagespeed.ic.A 88vpziOG

रुग्णालयाच्या नव्या गरजा लक्षात घेता ११ मजल्याची सर्व सुविधांनी युक्त नवी इमारत उभारण्यात आली आहे. विशेषोपचारासाठी सर्वसामान्य गरीब माणसाला अत्याधुनिक सुविधांच्या आधारे आरोग्य उत्तम सुविधा मिळावी असा शासनाचा प्रयत्न आहे. गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी या सुविधांचा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्रीडांगणासाठी अतिरिक्त सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्लेग, स्वाईन फ्ल्यू, कोविड सारख्या संकटाच्या काळात ससून रुग्णालयाने उत्तमरीतीने रुग्णसेवा केली. रुग्णालयाच्या नव्या इमारतीवर १८३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. अद्ययावत उपचार सुविधा असलेली नवी इमारत रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही येथे दर्जेदार सुविधांची निर्मिती होत आहे. इंटरव्हेंशन रेडीओलॉजी विभागासाठी टाटा ट्रस्टतर्फे २ कोटी, महिलांच्या स्वतंत्र क्ष-किरण तपासणी केंद्रासाठी फजलानी ट्रस्टतर्फे २ कोटी ५० लाख आणि मध्यवर्ती चिकित्सालयीन प्रयोगशाळेसाठी पंजाब नॅशनल बँक व पहल फाऊंडेशनमार्फत ५ कोटी ३५ लाख रुपये सीएसआरमधून देण्यात आले आहेत.

यापुढील काळात रुग्णालयात किडनी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येतील, असेही श्री.मुश्रीफ म्हणाले. रुग्णालयात १४० मृतदेह शव शीतगृहात जतन करण्याची आणि ३० वर्षाचे अभिलेख जतन करण्याची सुविधा शवचिकित्सा केंद्राच्या नव्या इमारतीत आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

xWhatsApp Image 2024 01 05 at 2.13.53 PM 2.jpeg.pagespeed.ic.EDYphj5vXa

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, तृतीयपंथीयांसाठी केलेल्या नव्या स्वतंत्र वॉर्डमुळे तृतीयपंथीयांना सन्मान मिळेल. राज्य महिला आयोगाने या वॉर्डसाठी पुढाकार घेतला. समाज नेहमी तृतीयपंथीयांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ.काळे यांनी प्रास्ताविकात बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय येथील विविध विकासकामांविषयी माहिती दिली. नव्या इमारतीमुळे ५७० खाटा उपलब्ध झाल्याने रुग्णालयात एकूण १ हजार ९०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी चांदनी गोरे यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ससून सर्वोपचार रुग्णालयाची नूतन इमारत, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले शवागार, कर्करोगाच्या निदानासाठी वापरण्यात येणारे पेटस्कॅन आणि नूतनीकरण केलेल्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या चित्रफीतीच्या माध्यमातून शुभेच्छा

विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे भारताबाहेर असल्याने त्यांनी कार्यक्रमासाठी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्य. १६७ वर्षाची परंपरा असलेल्या ससून रुग्णालयाचे काम रुग्णांना आधार देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे आहे. आज उद्घाटन होत असलेल्या विविध अकरा सुविधांसाठी विविध संस्थांनी शासनासोबत सहकार्य केले आहे.

श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून होत असलेल्या अन्नदान सेवेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लाभ होत आहे. मोठा स्त्रीरोग चिकित्सा विभाग रुग्णालयात उभा रहावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली. पालकमंत्री अजित पवार यांनी सातत्याने ससूनच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

०००Source link

Leave a Comment