उदगीर : विविध विकासकामांचे मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण


सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उदगीर तालुक्याच्या विकासाला गती – मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. ३० (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून याकरिता विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. तर उदगीर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकासकामे सुरू असून यापुढेही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास कामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर येथे तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये ना. चव्हाण व ना. बनसोडे बोलत होते.

खासदार सुधाकर शृंगारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, गणेश हाके, कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यावेळी उपस्थित होते.

देशात ग्रामीण व शहरी भागात शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पोहविण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखालील सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे ना. चव्हाण म्हणाले. तसेच गोरगरिबांना घरकुल, आरोग्य विषयक सुविधा, महिलांच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची, विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

उदगीर तालुक्यातील रस्ते, सिंचन, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, प्रशासकीय इमारतीच्या कामांसह विविध समाजांच्या विकासाला चालना देण्यावर आपला भर असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहेत, तसेच केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे 570 कोटी पेक्षा अधिक निधीतील कामे प्रगतीपथावर आहेत. उदगीर तालुक्याचा विकास करण्यासाठी यापुढेही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन अधिक गतीने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री. शृंगारे यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

कुलगुरु डॉ. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. पांढरे, माजी आमदार श्री. केंद्रे, माजी नगराध्यक्ष श्री. निटुरे, प्रवीण घुले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. माधव पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारत, मलकापूर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच अहमदपूर ते शिरूर ताजबंद ते उदगीर राज्य मार्गावर उदगीर तालुक्यातील मलकापूर गावाजवळ होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.

दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या बांधकामासाठी 59 कोटी 18 लाख 8 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून महाविद्यालयाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम होणार आहे. तर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 35 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुलाची लांबी 120 मीटर तर रुंदी 12.90 मीटर असेल. दोन्ही बाजू मिळून 800 मीटर लांबीच्या जोड रस्त्यांचाही यामध्ये सामावेश आहे. या पुलामुळे उदगीर शहरातून होणारी जड वाहतूक कमी होवून शहारातील वाहतूक सुरळीत होईल.

उदगीर शासकीय विश्रामगृह नवीन इमारत, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीचे लोकार्पण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर शासकीय विश्रामगृह नवीन इमारत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीचे लोकार्पण झाले.

शासकीय विश्रामगृह नवीन इमारतीमध्ये तळ मजला व पाहिला मजला यमध्ये व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी दोन कक्ष, चार साधे कक्ष, 150 व्यक्तींची बैठक व्यवस्था असलेले सभागृह, 25 व्यक्तींसाठी बैठक कक्ष आणि भोजन कक्षाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी 4 कोटी 20 लक्ष 38 हजार रुपये खर्च आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदगीर येथील कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीच्या बांधकामाला 6 कोटी 7 लक्ष रूपये खर्च आला आहे. या इमरतीमध्ये तळ मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय, तर पहिल्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय असणारं आहे.

लोकार्पण झाल्यानंतर ना. चव्हाण आणि ना. बनसोडे यांनी दोन्ही इमारतींची पाहणी केली. तसेच ना. चव्हाण आणि ना. बनसोडे यांनी कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांना नूतन इमारतीेमधील कार्यकारी अभियंता यांच्या कक्षातील खुर्चीवर बसवून शुभेच्छा दिल्या.Source link

Leave a Comment