आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा


अमरावती, दि. 4 (जिमाका): आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. व्यवहारे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

x1 29

आदिवासी क्षेत्रात शासकीय विभागांच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तरतूद करण्यात येते. त्याअंतर्गत आदिवासी घटक योजनेतील सर्व विभागांनी सन 2022-23 ची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी निर्धारित काळात निधी खर्च करुन विकास कामे पूर्ण करावीत. नजिकच्या काळात या विकास कामांची पाहणी करण्यात येईल. पाहणीच्यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणाचे विभागप्रमुख उपस्थित राहतील, असे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

सर्वसाधारण योजनेंतर्गत वन विभागाच्या विविध विभागांचा यावेळी आढावा घेतला. आदिवासी विभागातील पेसांतर्गत निधी, कृषी पंपाची विद्युत जोडणी, अमृत आहार योजना आदी विविध योजनांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन कामे करताना वन विभागाने जिओ टॅगिंग करावे. जेणेकरुन वन विभागामार्फत करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना ऑनलाईन बघता येईल. येत्या काळात आदिवासी विभागातील कोणत्याही दोन तालुक्यांची निवड करुन त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल. त्या अनुषंगाने वन विभागातील विकास कामांचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येईल.  केंद्र शासनाकडे वन विभागाचा प्रलंबित विकास कामांचा प्रशासनामार्फत पाठपुरावा करावा, असे श्री. पाटील म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत वनविभागाच्या पाचही विभागाचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2023-24 वरील प्राप्त निधी व खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2023-24 चा निधी विहित कालावधीत खर्च होईल, ही दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Comment