आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित


नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व सक्षमीकरणासाठी  आदिवासी भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आज सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दुधाळ गायी वितरण सोहळ्याप्रसंगी मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास शबरी महामंडळ नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी महेश पोतदार, शबरी महामंडळाचे महाव्यवस्थापक (प्रशासन/ वित्त) बाबासाहेब शिंदे, एन.डी.गावित, चिंतामण गावित, सुमुल डेअरी सूरत चे व्यवस्थापकीय संचालक अरूण पुरोहित, बॅक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय उपप्रबंधक संजय वानखेडे, बँक ऑफ बडोदा पुणे वरिष्ठ प्रबंधक प्रसाद पल्लेवाड, बँक ऑफ बडोदा नाशिक वरिष्ठ प्रबंधक विक्रांत काशिकर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यावेळी म्हणाले, रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्रातील आदिवासींची भ्रमंती थांबावी यासाठी नवनवीन योजनांची निर्मिती करून आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच रोजागार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या सक्षमीकरणास नवी उमेद मिळणार आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्ट्रॉबेरी लागवडीस अधिक प्राधान्‍य देण्याच्या दृष्टीने त्यांना लागवडीचे प्रशिक्षण, बियाणे यासह विक्री व्यवस्थापनास आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाईल. तसेच आदिवासी भागात घेण्यात येणारी पिके, वनउपज, औषधी वनस्पती यांच्यावर प्रकिया उद्योग उभारणीस येणाऱ्या काळात अधिक प्राधान्य देणार असल्याचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, आज आदिवासी भागात पेयजल योजनांच्या माध्यमातून घराघरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. येणाऱ्या काळातही आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज, पाणी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याच्या दृष्टीने शाळेतच त्याचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शाळेतच इंटरनेट व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेवून त्यांना भविष्यात येणाऱ्या  आव्हानांना सामोरे जायचे आहे. आज केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दुधाळ गायी वितरण लाभार्थ्यांना केले जात आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध होऊन या गायींपासून मिळणारे दूध हे गावातील केंद्रात संकलित केले जाऊन त्याचा मोबदला त्यांना बचत गटांच्या खात्यावर उपलब्ध होणार आहे. आदिवासी बांधवांना येणाऱ्या काळात अशा अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, प्राप्त संधींचे संवर्धन व जतन करून त्यांनी आर्थिक उन्नती साधावी अशी अपेक्षा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी व्यक्त केली.

1 20

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील बांधवांसाठी उत्पन्न निर्मितीच्या आणि उत्पन्न वाढीच्या योजनेमध्ये संयुक्त दायित्व गटांना दुधाळ जनावरांचे पालन करणे याचा समावेश आहे. सदरची योजना प्रकल्प कार्यालय नंदुरबार, धुळे, डहाणू, जव्हार व कळवण या कार्यक्षेत्रात पथदर्शी स्वरूपात शबरी वित्त व  विकास महामंडळ, नाशिक यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे तसेच त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे, प्रकल्प क्षेत्रातील जनावरांची गणना व दुध उत्पादन वाढविणे, त्यांच्याबरोबरच उत्पादित दुधास योग्य बाजारभाव उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. गुजरात राज्यातील धरमपूर येथील बाजारातून बचत गटांना दुधाळ गायी खरेदी करता येणार असून. बचत गटांनी येथे जाऊन दोन दिवस गायींपासून प्रतिदिन मिळणाऱ्या दुधाची लिटरनुसार खात्री करून मगच गायी खरेदी करावयाच्या आहेत. या गायींपासून प्राप्त होणाऱ्या दुधविक्रीसाठी गुजरात येथील सुमुल डेअरीशी महामंडळाकडून करार करण्यात आलेला असून आदिवासी बांधवाकडून गायींचे उत्पादित दुधाचे गावातच संकलन करून त्यांचे वितरण व विक्री या डेअरीकडे केले जाणार असल्याचे शबरी महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.डी गावित यांनी केले तर आभार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण विशाल नरवाडे यांनी मानले. कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना दुधाळ गायी खरेदीसाठी निधीचे पत्र, धनादेश, दुधाळ गायींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.

या संयुक्त गटांना झाले प्रातिनिधीक स्वरूपात वाटप

  • जय माता लक्ष्मी संयुक्त गट आंबेपाडे
  • बजरंगबली संयुक्त गट, बिबड
  • बिरसा मुंडा संयुक्त गट, बिबड
  • आयुष्यमित्र संयुक्त गट, सुकापुर
  • बिरसा मुंडा संयुक्त गट , चिंचले
  • कंसरा संयुक्त गट, चिंचले
  • पालवा संयुक्त गट, चिंचले
  • भोये संयुक्त गट, चिंचले
  • जय बजरंगबली संयुक्त गट, चिंचले
  • आदिवासी संयुक्त गट, चिंचले
  • बारागाव डांग संयुक्त गट, चिंचले
  • आदिवासी संयुक्त गट, बर्डीपाडा

तत्पूर्वी सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, मंडळ कृषी अधिकारी हंसराज भदाणे, मंडळ अधिकारी प्रभू गवळी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, तलाठी स्वप्निल पाडवी, प्रशांत कडाळे, कृषी सहाय्यक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Comment