आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल


जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; नवीन वर्षात ३४९५ एसटी बसेस सेवेत दाखल होणार

मुंबई, दि. २२: राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानाकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

xf987ba50 1260 4772 89f4 1eea64c80a58

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

x8428c624 94fb 40d3 a49d 7b0dc75178c5

राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डींग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

००००



Source link

Leave a Comment