‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास


 

मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख..

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनाने विविध प्रकल्प राबविले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल सेतू’ अस्तित्वात आला असून यामाध्यमातून मुंबईकरांचे एक स्वप्न आता साकार होत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक जाळे विस्तारणारा हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात आला असून तो आता वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत असलेला हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभियांत्रिकी आविष्कार मानला जात आहे.

DJI 20231215170115 0027 D
default

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) करण्यात आले आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.

अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एमएमआरडीएने घेतली आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आली आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनविण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवलेले आहेत.

प्रकल्पासमोरील आव्हाने

अटल सेतू बनविणे अतिशय आव्हानात्मक काम होते. यासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आला. एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन या व्ह्यू बॅरिअर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

चौफेर विस्तारासाठी सहाय्यभूत

मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादांमुळे शहरातील जमिनीच्या टंचाईची समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरी रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर-दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. या परिसरात दहा विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई परिसरातील नागरिकांना विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत असून अटल सेतूच्या रूपाने प्राधिकरणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे तसेच नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, यात शंका नाही.

– ब्रिजकिशोर झंवर

विभागीय संपर्क अधिकारी

Source link

Leave a Comment